जळगाव (प्रतिनिधी) नादुरुस्त माेबाइलच्या पैशांच्या वादातून रविवारी दुपारी महामार्गालगत शिव कॉलनीतील देशी दारुच्या अड्ड्यावर चाॅपरने सहा वार करून २३ वर्षीय तरुणाचा खून करण्यात अाला. या खुनातील मुख्य संशयिताला पाेलिसांनी शिरसोलीतून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ अाॅगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली.
जैन उद्याेग समुहात कंत्राटी कामगार असलेल्या अक्षय अजय चव्हाण (वय २३) याचा खून झाला होता. या घटनेतील प्रमुख संशयित आरोपी नीलेश प्रवीण पवार (रा. रिंगरोड, जळगाव) हा शिरसोली येथे आल्याबाबतची माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांना मिळाली. पाेलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी अाराेपीला पकडण्यासाठी दाेन पथक नेमले. एका पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, फौजदार अतुल वंजारी यांचे एक तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे यांचे दुसरे पथक होते.