मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीतून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यापासून देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. काल रात्री मुंबई एटीएसने कारवाई करत या लिंकशी संबंधित आणखी एका दहशतवाद्याला मुंबईच्या जोगेश्वरी भागातून अटक केली आहे. जाकीर हुसेन शेख असं या दहशतवाद्याचं नाव आहे.
जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकंच नाही तर संशयित व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मद याचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. जाकीर हा जान मोहमद याच्या संपर्कात होता. जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयामध्ये मध्यरात्रीपासूनच हालचाल दिसू लागली होती. रात्री २ च्या सुमारास एटीएसचे वरीष्ठ अधिकारी देखील कार्यालयाबाहेर दिसून आले, तेव्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले. अखेर, रात्री ३ च्या सुमारास महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, यासंदर्भातली टिप दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडूनच आल्याची देखील माहिती मिळत आहे.
मोठा कट उधळला
देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी १४ सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्या पत्नीने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली.
जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.