नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आज जम्मू काश्मीरमधील १४ जिल्ह्यांमध्ये धाडी टाकल्या आहेत. दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणात एनआयएनं चौकशी सुरु केली आहे. एकूण ४५ ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी निधी पुरवठा प्रकरणी एनआयएने जम्मू काश्मीरमधील १४ जिल्ह्यांमध्ये धाड टाकली आहे. एकूण ४५ ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई केली जात आहे.
पाकिस्तानला तसंच फुटीरतावाद्यांना समर्थन करणाऱ्या जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने २०१९ मध्ये बंदी टाकली आहे. बंदी असतानाही जमात-ए-इस्लामीकडून सुरु असलेल्या कारवाया रोखण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकण्यात आले आहेत. या धाडी टाकण्याआधी दिल्लीमधून वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम श्रीनगरला रवाना झाली.
या चौकशी संदर्भात एनआयएच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, एनआयए सीआरपीएफ सोबत मिळून जम्मू काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्ये चौकशी करत आहे. अद्याप चौकशीत काय समोर आलंय याबाबत मात्र कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.