येवला (वृत्तसंस्था) जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर हक्काबाबत नोंद प्रमाणित करण्यासाठी तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. मनोहर राठोड असे ताब्यात घेतलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी असलेल्या तक्रारदाराने राजापूर येथे जमीन विकत घेतली असून, या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मौजे राजापूर तलाठी यांनी घेतलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूरचे मंडल अधिकारी मनोहर राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी (दि. ३१) मंडल अधिकारी मनोहर राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पुढील तपास करीत आहेत.