अमळनेर (प्रतिनिधी) बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरताना दोघा संशयितांना पकडण्यात आल्यानंतर महिला पोलिस कर्मचारी संशयिताना ताब्यात घेण्यासाठी गेल्या असता चोरट्या महिलांनी उलट महिला पोलिसाला धक्काबुक्की करीत नोकरीवरून सस्पेंड करण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील बसस्थानकात रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉन्स्टेबल नम्रता रमेश जरे यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी दुपारी चार वाजता अमळनेर-चोपडा बसमधील प्रवासी प्रतिभा राजेंद्र कोळी (34, सारबेटे, ता.अमळनेर) यांचे मंगळसूत्र संशयित सुनीता सागर चौधरी (वाघाडी, पंचवटी नाशिक) व ममता सतीश चौधरी (एमआयडीसी, इच्छादेवी पोलिस चौकी, जळगाव) यांनी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कोळी यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर दोघा महिलांना पकडण्यात आले. यावेळी कर्तव्यावरील कॉन्स्टेबल जरे या बसमध्ये गेल्यानंतर संशयितानी उलट महिला कर्मचार्याला धक्काबुक्की करीत आमच्या नांदी लागू नको, अन्यथा तुझी नोकरी खावू, अशी धमकी दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अमळनेर पोलिसात दोघाांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.