शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मालपूर येथील सोमनाथ शंकर चित्ते (७१) व कैलास शंकर चित्ते (वय ५८) या दोघा भावांनी एकाच दिवशी मंगळवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. दोघेही अल्पकाळ आजारी होते.
भगवा मारुती चौकात राहणारे सोमनाथ शंकर शिंपी हे गावातील एक उत्कृष्ट टेलर होते. शांत, संयमी व दीनदुबळ्या गरिबांना ते अल्पशा किमतीत कपडे शिवून देत असल्याने गावात परिचित होते. तर कैलास चित्ते हे किरकोळ व्यवसायासह शेती व्यवसाय करत होते. सोमवारी सायंकाळ पासून सोमनाथ चित्ते यांची प्रकृती खालावल्याने सर्व कुटुंबीय रात्रभर त्यांच्या जवळ बसून होते. तर कैलास चित्ते हे देखील आजारी असल्याने त्यांचे शेतात तात्पुरते वास्तव्य होते. मंगळवारी सकाळी ६.४५ सोमनाथ चित्ते यांची प्राणज्योत मालवली.
भावाच्या निधनाची वार्ता सांगण्यासाठी पुतण्या पिंटू शिंपी शेतात गेला असता तेथे कैलास चित्ते यांनी देखील आपला देह ठेवल्याचे उघड झाले. कैलास यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे. तर सोमनाथ यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, असा परिवार असून ते प्रसाद चित्ते यांचे वडील होत.