चोपडा (प्रतिनिधी) ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर चोपडा ते शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळील पोलीस चौकीजवळ दुचाकीवरून चोपड्याकडे जाणाऱ्या दोन तरुणांची झाडाझडती केली असता त्यांच्याकडे १ लाख ७२ हजार ८१० रुपयांचा साडेसात किलो गांजा आढळला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याची ही घटना २९ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शिव दिनेश भोसले (वय २२) व सुनील यशवंत नन्नवरे (वय २०) हे दोघे २९ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हिरो कंपनीच्या दुचाकी (एमएच १९, ईएच ०८५४) ने शिरपूरकडून चोपड्याकडे जात होते. चोपडा ते शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळील पोलीस चौकीजवळ या दोन्ही तरुणांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडील गोणीत १ लाख ७२ हजार ५१० रुपयांचा ७ किलो ८५५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी एकूण २ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिव भोसले व सुनील नन्नवरे या दोघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.