जळगाव (प्रतिनिधी) शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या कुटुंबातील एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे लग्न घरी शोककळा पसरली. ही घटना शनिवार, ९ डिसेंबर रोजी घडली. तर तस्मिरा परवेझ सय्यद मयत बालिकेचे नाव आहे.
उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आलेल्या नातेवाईकांमध्ये निजामपूर ता. साक्री येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात डुप्लेक्स योजनेंतर्गत आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती.
खेळता खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या सात वर्षीय बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टैंकमध्ये पडून मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह जळगावला आले होते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या आक्रोशाने मंडपात अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
















