चाळीसगाव (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील एका गावातील १७ वर्ष दहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी लग्न लावल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली व त्यातून तिने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून पतीसह सहा आरोपींविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील एका गावातील १७ वर्ष व दहा महिने वयाच्या पीडीतेचे सुमारे एक वर्षांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणार्या तरुणाशी लग्न लावण्यात आले. पीडीता अल्पवयीन असताना लावण्यात आलेले लग्न व त्यानंतरच्या संबंधातून पीडीता गर्भवती राहिली व तिने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी पीडीतेने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिल्यानंतर पतीसह आई, वडील, सासु, सासरे, दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे करीत आहेत.