छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू दुपारी चार वाजता झाला. ही घटना कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथे बुधवारी घडली. मनिषा वाल्मीक जाधव (३०), असे मृत विवाहितेचे नाव आहे.
कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथे मनिषा जाधव यांची तीन एकर शेती आहे. बुधवारी जाऊबाई आणि सासऱ्यासोबत मिळून ती शेतातील कपाशीची निंदणी, खुरपणीचे काम करत होती. शेतात नवीन विहीर खोदलेली असल्याने नवीन लाईट मीटर घेण्यासाठी तिने नवीन कोटेशन भरले होते.
विहिरीपासून दोनशे फूट अंतर असल्याने तिने दोन पोलची मागणी विद्युत मंडळाकडे केली होती. परंतु यावर टाळाटाळ होत असल्याने दोनशे फूट केबल टाकून विहिरीवर लाईट आणली होती. त्याच केबलचा या मनिषा जाधव हिला शॉक लागला. सासरे विठ्ठल जाधव यांनी उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले खरे. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, चार महिन्याचा मुलगा आहे. कन्नड शहर पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.