मुंबई (वृत्तसंस्था) “महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi)ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली आहे. हे राजकीय आरक्षण गेले नाही, त्याचा मुडदा पाडला आहे. यात मोठे षडयंत्र आहे. विश्वास घाताचे राजकारण दोन वर्षांपासून तयार होत आहे” अशी टीका विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज केली.
फडणवीसांनी म्हटलं की, महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली आहे. यात मोठे षड्यंत्र आहे. सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही पूर्ण केली नाही. नंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला, असं फडणवीस म्हणाले. कोर्टाने ट्रिपल टेस्ट करा असं कोर्टाने 2019 साली सांगितलं. त्यावेळी ठाकरे सरकार होतं पण सरकारने फार काही केलं नाही. सहा वेळा वेळ मागितली, कार्यवाही पूर्ण केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. सातत्यानं महाविकास आघाडीकडून विश्वासघाताचं राजकारण केलं जात आहे. योग्य काळजी न घेताच आकडेवारी सरकारनं सादर केली, असंही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, 2010 साली 50 टक्के आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही असं सांगितलेलं. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. कोर्टात जाणारे कोण आहेत तर एक काँग्रेस आमदारांचा मुलगा तर दुसरा नाना पटोले यांचा कार्यकर्ता. कोर्टात कोण गेलं तर काँग्रेसवाले गेले. पण आम्ही सजग होतो आणि आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडून जनगणनेचा डेटा मागितला. रातोरात आम्ही अध्यादेश काढला, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसकडून ओबीसींचा वापर हा दिखाऊपणापुरताच केला गेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.