जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या काव्यरत्नावली चौक ते रामानंद नगर स्टॉप रस्ता दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. गिरणा टाकीजवळ पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला.
कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, पार्वताबाई भील, नितीन बरडे, अनंत जोशी, संतोष पाटील, अजित राणे, प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील, अभियंता मिलिंद जगताप आदींसह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. शहराचा मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या गिरणा टाकी, काव्य रत्नावली चौक रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अमृत योजनेच्या चाऱ्या खोदलेल्या असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.