नागपूर (वृत्तसंस्था) एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे. या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.
एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी त्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या असेही देशमुख म्हणाले. राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे. त्याचे व्याप चार पटीने जास्त आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र आता ३६ जिल्ह्यांपैकी १५ जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने अत्यंत कमी वेळेत रुग्णालयात सोयी वाढवल्या, शेकडो खाटा असलेल्या कोविड केअर सेंटर उभारले. ऑक्सिजनयुक्त खाटाही वाढवल्या त्यामुळे आता महाराष्ट्रात हळू हळू स्थिती नियंत्रणात येत आहे. त्याच प्रमाणे नागपुरात ही स्थिती हळू हळू सुधारत दावा देशमुख यांनी केला.