मुक्ताईनगर (3 डिसेंबर 2024) ः दिल्ली येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाल्यानंतर पूर्णाड फाट्यावर दोन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. राजस्थानच्या परप्रांतीय चालकासह तिघांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यंत्रणेच्या रडारवर आता गुटखा पुरवठादार व खरेदीदार असून लवकरच त्यांच्यापर्यंत यंत्रणा पोहोचण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांना गुटखा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. मुक्ताईनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत पूर्णाड फाट्यावर ट्रक (एन.एल.01 ए.जे.1725) आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा आढळल्याने तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. ही कारवाई मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर-बर्हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्यावर 1 रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली होती.
राजस्थान राज्यातील तिघांना बेड्या
मुक्ताईनगर पोलिसात हवालदार रवींद्र अभिमान पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक सकरुल्ला अब्दुल अजीज (35, इमाम नगर, जेरका, फिरोजपूर, जि.नुहू, हरियाणा), कैफ फारुख खान (19, ढळायत, पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान), तारीफ लूकमान खान (23, इमाम नगर, तहसील जेरका, फिरोजपूर, जिल्हा नुहू मेवात, राज्य हरियाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली.
दोन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
ट्रकमधून एक कोटी 34 लाख 88 हजार 480 रुपये किंमतीचा एकूण 102 पिवळ्या रंगाच्या गोण्यांमधील 5 एचके असे इंग्रजीत लिहिलेला गुटखा, 43 लक्ष 77 हजार 600 रुपये किंमतीचा रॉयल 1000 असे इंग्रजीत लिहिलेला गुटखा, 30 लक्ष रुपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक, 10 हजार रुपये किंमतीचा विवो मॉडेलचा मोबाईल फोन, पाच हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दिड हजार रुपये रोख मिळून एकूण दोन कोटी आठ लाख 82 हजार 580 रुपयांचा सुगंधित गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार दीपक माळी, नाईक रवी पाटील, कॉन्स्टेबल सचिन पोळ तसेच मुक्ताईनगर निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी केली.