जळगाव (प्रतिनिधी) सद्य:परिस्थितीत कपाशी पिक हे अंतिम टप्यात आहे व बहुतांश शेतकऱ्यांच्या ३ ते ४ वेचण्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी कपाशीचे पिक वाळायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील काही भागामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ३० ते ४० टक्के पर्यंत आढळून आला. त्यामुळे हे पिक पुढे ठेवल्यास किंवा फरदड घेतल्यास पुढील येणाऱ्या खरिप २०२१ च्या हंगामाध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून पुढील हंगामातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करणे अतिशय महत्वाचे आहे.
कपाशीची तिसरी वेचणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर नंतर किंवा जास्तीत जास्त १५ जानेवारी आधी शेतातून पऱ्याट्या काढून टाकाव्यात, कापूस पिकाचा खोडवा किंवा फरदड पिक घेण्याचे टाळावे. फरदड घेतल्या गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम कायम राहून या किडीचा प्रादुर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्यता अधिक असते. कपाशीची शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतात बकऱ्या, गाई व गुरेढोरे सोडावीत ही जनावरे प्रादुर्भाव ग्रस्त फस्त करत असल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होते. गुराढोरांनी बोंडे खाल्यानंतर उभे कापसाचे पिक थ्रेशर मशीनीने तुकडे करुन जमिनीत दाबून टाकावे व गाडलेल्या कापसाच्या पिकावर स्पिंक्लरने हलके पाणी देऊन त्यावर कचरा कुजवणाऱ्या ट्रायकोडर्मा बुरशी द्रावणाची फवारणी करावी, कापूस संकलन केंद्रे व जिनींग फॅक्टरीमध्ये कामगंध सापळे लावावेत, जेणेकरुन हंगामानंतरच्या पतंगांचा मोठया प्रमाणावर नायनाट करावयास मदत होईल, हंगाम संपल्याबरोबर खोल नांगरणी करावी म्हणजे किडीचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील.
याप्रमाणे सर्व उपाय गाव पातळीवर एकत्रीतपणे अंमलात आणल्यास पुढील वर्षी (खरीप २०२१) गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत होईल. असे विभागप्रमुख, किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.