नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्याचे राजकीय वातावरण परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
यावेळी रामदास आठवलेंनी महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं असल्याची टीकाही केली. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, अनिल देशमुख यांनी पत्र लिहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये १०० कोटींच्या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं आहे. मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलो असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी विचार करु असं सांगितलं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असून खूप गंभीर घटना समोर येत आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं काम एक पोलीस अधिकारी करतो. गृहमंत्री सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी मिळाले पाहिजेत असं सांगतात. पहिल्यांदाच असं होत आहे त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.