नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अॅंटिग्वा येथून गायब झाला आहे. यानंतर अँटिग्वा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आणखी एक आरोपी नीरव मोदी याचे प्रत्यार्पण अंतिम टप्प्यात असताना मेहुल चोक्सीने पलायन केल्यानं केंद्र सरकारला झटका बसला आहे. चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरु होती. त्याचा अंदाज घेत चोक्सीने अॅंटिग्वामधून पलायन केल्याचे बोलले जात आहे. अॅंटिग्वाबरोबरच इतर कॅरेबियन देशांचे सुद्धा चोक्सीकडे नागरिकत्व असल्याचा संशय आहे. त्यामळेच तो कॅरेबियन बेटांवर मुक्त संचार करत आहे.
पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८ मध्ये मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांनी भारतातून पलायन केले होते. चोक्सी कॅरेबियन देश अॅंटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून होता. मात्र, अॅंटिग्वान्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार चोक्सी रविवारपासून बेपत्ता आहे. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला आहे. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलीसांनी चोक्सीचा शोध सुरु केला आहे. अॅंटिग्वाच्या जॉन्सन पॉइंट पोलीस स्टेशनमध्ये मेहुल चोक्सीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच चोक्सी दिसल्यास कळवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी स्थानिक जनतेला केले आहे.
यंदा मार्च महिन्यात अँटिग्वा आणि बारबुडानं चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, चोक्सीनं सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायलयात धाव घेतली. अर्थमंत्री निरमला सीतारामण यांनी मार्च महिन्यात असा दावा केला होता, की फरारी विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतात माघारी येत आहेत.