धरणगाव (प्रतिनिधी) भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल कुणीही एकेरी भाषेचा उल्लेख केला तर संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मराठा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले.
अनेक वेळा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून कार्यक्रम किंवा मीडियामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल एकेरी भाषेत उल्लेख केला जातो. त्यानंतर माफी मागून दिलगिरी व्यक्त करून प्रकरण थांबवण्यात येते. परंतू भविष्यात कोणाकडूनही असे व्यक्त केले जाऊ नये, यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे महाराष्ट्राचे घटनेत दुरुस्ती करण्यात यावी. विधानपरिषद,विधानसभेत अशा प्रकारची तरतूद करण्यात यावी,असे लेखी स्वरूपात निवेदन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले असून याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा देण्यात आली आहे. निवेदन देताना आमदार चंद्रकांत पाटील, मराठा फाउंडेशनचे राज्य उपप्रमुख पी.एम. पाटील सर,जळगाव तालुका बाळासाहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण,प.स उपसभापती डी.ओ. पाटील यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.