चोपडा (प्रतिनिधी) आपल्या जीवनात ज्ञान हेच शाश्वत आहे. त्यामुळे आपल्या जीवनात ज्ञान देणाऱ्या गुरुचे अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांनी आपला कल ओळखून पुढील क्षेत्र निवडावे. आपल्या आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे प्रत्येक पाल्याचे कर्तव्य असले तरी पालकांनी आपल्या पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा करू नये, असे प्रतिपादन गटशिक्षणधिकारी अविनाश पाटील यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, मानद सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे. राधेश्याम पाटील, सहप्रकल्प प्रमुख रोटे. प्रदीप पाटील हे उपस्थित होते.
या गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधून इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच रोटरी सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया यांनी तर सूत्रसंचालन रोटे. भालचंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.