जळगाव (प्रतिनिधी) मागील दोन दिवसापासून दुध संघ निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सुरु असलेले प्रयत्न जवळपास संपुष्टात आले आहेत. त्यामुळे सर्व पक्षीय दिग्गज निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु दुपारी तीनपर्यंत आणखी काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांनी आपापले बैठका मिळावे सुरू केल्यामुळे सर्वपक्षीय पॅनलची शक्यता धूसर झाली होती. परंतू शनिवारी सकाळपासून दोन दिग्गज नेते सर्वपक्षीय पॅनलसाठी जोरदार फील्डिंग लावत असल्याची चर्चा सुरू होती. परंतू आमदार मंगेशदादा चव्हाण हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्यामुळे सर्वपक्षीय पॅनलची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. माघारीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत आणखी काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे एका गटाने रात्रीतून मोठी तयारी केली असून रावेर, यावल,मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातून ५० लक्झरी बुक केल्या असून आज सायंकाळीच मतदारांना गुवाहाटीच्या सहलीवर रवाना केले जाणार असल्याचे कळते. थोडक्यात विधानपरिषदच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत साधारण २ ते ३ लाख फुली चालणार असल्याचे बोलले जात आहे. दुपारी तीन नंतर राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.