जळगाव (प्रतिनिधी) राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व नवाब मलिक यांना ट्वीट करीत टोमणा लगावला. आता कळाले… ठाकरे सरकारमधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात, अशी टीका करत राणे यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. कारण मंत्रालय कुठलं मॉल सेंटर नाही किंवा कुठलीही खाऊ गल्ली नाही. तर ते राज्याच मुख्यालय आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. याच मंत्रालयात सर्वसामान्य जनता आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्या आयुष्यातील गंभीर प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयात येत असतात. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
यावर माजी खासदार निलेश राणे यांनी भरमसाठ करून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई नाईटलाइफची स्वप्ने पाहणारे असे म्हणत त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोमणा लगावला आहे. तसेच आता कळाले… ठाकरे सरकारमधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात याचे उत्तम उदाहरण आम्हाला मिळाले आहे. झिंग झिंग झिंगाट.. मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राणे कुटुंबीय आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. आजवर दोघांनी एकमेकांवर अनेकवेळा टीका केली आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल – दत्तात्रय भरणे
या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दत्तात्रय भरणे याबाबत बोलताना म्हणाले की, “ही अत्यंत गंभीर बातमी आहे. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल.” पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही.”