जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाच्या लेखापरीक्षण अहवाला जवळपास पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. माजी व आजी संचालकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. अपहाराची रक्कम भरा अन्यथा आगामी तीन दिवसांत नाइलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जिल्हा दुध संघात अपहाराबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अपहाराबाबत लेखापरीक्षणात नोंदी असल्याबाबत पत्रकारांनी मंत्री महाजन यांना विचारले त्यांनी सांगितले की, जिल्हा दूध संघाच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली. बैठकीला मी स्वतः उपस्थित नव्हतो. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा दूध संघाचे माजी तसेच विद्यमान संचालकांना त्याबाबत माहिती दिलेली आहे असे त्यांनी नमूद केले आहे. अपहाराचे पैसे लवकर भरा अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.
मागील गुन्हा दाखल झालेले अडीच कोटी व इतर मिळून साडेपाच कोटी रुपयांचा अपहार दूध संघात झालेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संचालकांनी स्वतःच्या वाहनांचे टायर, ट्यूब दूध संघाच्या पैशातून बदलले आहेत. जी वाहने दूध संघाकडेच नाहीत अशा वाहनांची बिले काढण्यात आलेली आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. गुन्हा दाखलची प्रक्रिया अशी लेखापरीक्षण करताना अपहार आढळून आल्यास त्याबाबतचा वेगळा विनिर्दिष्ट अहवाल सादर करण्यात येतो. त्या अनुषंगाने जबाबदार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी दुग्धविकास विभागाचे निबंधक देतात. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होतो,असेही महाजन म्हणाले.