जळगाव (प्रतिनिधी) स्टेट बँक ऑफ इंडिया व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून मेहरूण तलावाच्या पूर्वेला विविध प्रकारच्या दोन हजार पाचशे वृक्षांची लागवड मियावाकी पद्धतीने करण्यात येणार असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासकीय कार्यालय, नाशिक येथील उपमहाप्रबंधक राजीव सौरव, क्षेत्रीय व्यवस्थापक अमित कुमार, मुख्य व्यवस्थापक शिरीष कोल्हे अरुण अटकालिकर, समृद्धी केमिकल्स ली. चे संचालक सुबोध चौधरी यांच्या उपस्थितीत आज सकाळी करण्यात आला.
जाणून घ्या… मियावकी म्हणजे काय?
जपानी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या पध्दतीला मियावकी असे म्हटले जाते. मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करतांना २ बाय २ फूट अंतरावर वृक्षलागवड केली जाते. त्यात झाडांची वाढ दहा पट जलद होते. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या स्थानिक प्रजाती लावता येतात. नेहमीपेक्षा तीस पट घनदाट जंगल तयार होते. या झाडांमुळे ३० टक्क्यांपर्यंत कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेण्यास त्यामुळे मदत होते. दोन वर्षांनंतर झाडांची निगा घ्यावी लागत नाही. हे जंगल आवाज व धुलीकणास रोध निर्माण करते. या जंगलातून विविध पक्षी व फुलपाखरांना आश्रयस्थान निर्माण होते. मराठी प्रतिष्ठान प्रथमच अशा प्रकारे वृक्षारोपण करीत असून प्रतिष्ठान ला स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय,जळगांव यांचे सहकार्य मिळत आहे.
मियावाकी वृक्ष लागवड शुभारंभ प्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे,सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, मराठी प्रतिष्ठान चे विश्वस्त संध्या वाणी, अनुराधा रावेरकर, निलोफर देशपांडे, डॉ सविता नंदनवार, दीपक धांडे उपस्थित होते.