सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यामुळे नितेश राणेंची रवानगी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत होणार आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी व्यायालयात हजर केलं गेलं. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. आमदार नितेश राणेंना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं. तर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला.
आमदार नितेश राणेंना गोव्यातील त्यांच्या हॉटेलवर घेऊन चौकशी केली असता त्यांचा सीडीआर रिपोर्ट आणि नीतेश राणे, राकेश परब याचं तिथे झालेल्या संभाषणाची चौकशी पोलिसांनी केली आहे. त्यातून त्यांना काही माहिती मिळाली आहे, मात्र अजून चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असं सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला. या गुन्हाची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असंही ते म्हणाले.
दोन दिवसांत आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले, अजून तपास बाकी असून पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. दरम्यान आजच्या सुनावणीवेळी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.