नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याच पुण्याईवर चालला आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
“राहुल गांधी यांचं म्हणणं सरकारने गांभीर्यानं ऐकलं पाहिजे. सरकारची दोन वर्षे तर कोरोनामध्येच निघून गेली. देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी आहे. गेल्या ६० वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच पुण्यावर देश चालत आहे. नवीन काही झालेलं नाही पण आपण अपेक्षा करु शकतो,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“सरकारला लोक निवडून देत असतील तर लोकांचा विश्वास आणि बहुमत मिळालेलं आहे. पण आजही देशात महागाई, बेराजोगारी आहे. करोनानंतर पसरलेली अराजकता कायम आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात…प्रत्येकाला अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला व्हायचं नाही. फक्त रोजगार, रोजी रोटी मिळायला हवी. सात वर्षात देशातील जनतेला हे मिळालं का याचं चिंतन करायला हवं,” असा सल्ला संजय राऊतांनी मोदी सरकारला दिला आहे. “मोदींकडे उत्तम नेतृत्वक्षमता आहे. आजही त्यांच्याकडून आपण ते देशाला योग्य दिशा, मार्ग दाखवतील अशी अपेक्षा करु शकतो,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.