मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकार देशातील युवा पिढीला ड्रग्जच्या नशेच्या आधीन करत असून, दुसरीकडे धर्माचे राजकारण करत भांडणे लावण्याचे काम करत आहे, असा आरोप गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात केला.
मुंबई काँग्रेसच्या गुजराती सेलच्या विशेष संमेलनाचे आयोजन नुकतेच मुंबईत करण्यात आले होते. आगामी मुंबई महापालिका व विधानसभा निवडणुकीत गुजराती समाजाला काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हार्दिक पटेल यांनी यावेळी सांगितले. व्हायब्रड गुजरातच्या नावाखाली भाजप सरकारतर्फे कार्यक्रम घेतले जात आहेत. अनेक कंपन्या गुजरातमध्ये येत असल्याचे सांगितले जाते. पण तरीही गुजरातमधील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. एकट्या गुजरातमध्ये ५२ लाख तरुण सद्यस्थितीत बेरोजगार आहेत. भाजपचे नेते स्वतःला हिंदुंचे कैवारी म्हणवून घेतात व देशातील हिंदुंचा विकास आम्ही केला असे म्हणतात. परंतु, हिंदुत्व आणि रामाच्या नावाखाली देशामध्ये धर्माचे राजकारण करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे. वास्तविक देशातील १४० कोटी जनता महागाई, बेरोजगारी व महिलांवरील अत्याचारासारख्या समस्यांनी होरपळून निघालेले असून, मोदी सरकारने धर्माच्या नावाखाली हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडणे लावण्याचे काम केल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला.
मोदी सरकार देशातील युवा पिढीला ड्रग्जच्या आधीन करू पाहत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण देशभर गाजले. त्यानंतर गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे २१ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज़ जप्त करण्यात आले. मात्र, यानंतर कारवाईबाबत कोणतेही वृत्त समोर आले नाही. याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. यामागे कोण आहे, याचे सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी हार्दिक पटेल यांनी केली आहे.