नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने 17 पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या या निर्णयांची माहिती दिली.
बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय 2022-23 या वर्षासाठी आहे. दरम्यान, 2021-22 साठी पिकाचा एमएसपी 1940 रुपये प्रति क्विंटल आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलेय की, “खरीब पिकांसोबतच रब्बी खतांसाठी पुरेसा युरियाचा साठा आहे. युरियाचा हा साठा डिसेंबर 2022 पर्यंत पुरू शकतो. त्यामुळे युरिया आयात करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमतीत घट झाली आहे. येत्या काळात या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.” सरकारने आधीच 16 लाख टन युरिया आयात केला आहे. जो पुढील 45 दिवसांत पाठवला जाईल, असेही मांडविया म्हणाले.
मत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, 2022-23 साठी खरीप हंगामासाठी 14 पिकासाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 2022-23 साठी पिकाचा एमएसपी 2040 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकाच्या एमएसपीमध्ये 100 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. तूरडाळीचा एमएसपी 6600 रुपये प्रति क्विंटल करण्यात आलाय. गतवर्षीपेक्षा यामध्ये 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तिळाच्या किंमतीत प्रति क्विंटल 523 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर मूग दाळ प्रति क्विंटल 480 रुपयांनी वाढली आहे. सूर्यफूलच्या किंमतीत 358 आणि भुईमूगाच्या किमतीत प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
कोणत्या पिकांवर एमएसपी वाढवण्यात आला
भात (सामान्य), भात (ए ग्रेड), ज्वारी (हायब्रीड), ज्वारी (मालदांडी), बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल बियाणे, सोयाबीन, तीळ, रामतीळ, कापूस (मध्यम फायबर), कापूस (लांब फायबर) वर एमएसपी वाढवली आहे.
एमएसपी म्हणजे काय?
किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्याच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते ते एमएसपी आहे.