मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पांडेय यांनी पोलिसात तक्रार केली आहे. आपण पोलिसात तक्रार दिल्याची माहिती पांडेय यांनी ट्विटरवर दिलीये. त्यांच्या ट्विटला निखिल वागळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एक साधे ट्विट त्यांना त्रासदायक वाटते. मी माझ्या ट्विटवर ठाम आहे, अशा शब्दात वागळेंनी उत्तर दिलं आहे.
संजय पांडेय यांनी यांच्या ट्विटला निखिल वागळे यांनी उत्तर दिले आहे. “माझ्या मोदी-रावण ट्विटनंतर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रमुखांनी मला अटक करण्याची मागणी केली आहे. पण त्यांचा ढोंगीपणा पाहा, भाजपचे IT सेल विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, माजी पंतप्रधानांवर कोणत्याही थराला जाऊन टीका करतात. पण आता एक साधे ट्विट त्यांना त्रासदायक वाटते. मी माझ्या ट्विटवर ठाम आहे.” या शब्दात निखिल वागळे यांनी संजय पांडेय यांना उत्तर दिले आहे.
देशातील बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा पांडेय यांचा आरोप
आपल्या परखड पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या निखिल वागळे यांनी दसऱ्यानिमित्त एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, “विजयादशमीच्या सर्वांना शुभकामना. सर्व वाईट गोष्टींचा नाश होवो. सर्व रावणांचा पराभव होवो” आणि यासोबत मोदी यांचा प्रतिकात्मक चेहरा असलेला रावणाचा फोटोही ट्विट केला होता. या ट्विटनंतर भाजपचे उ. भारतीय मोर्चाचे संजय पांडेय यांनी यासंदर्भात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देऊन FIR दाखल करुन घेण्याची मागणी केली आहे. निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांचा फोटो वापरुन रावण असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याने देशाचा अपमान झाला आहे, तसेच या देशातील बहुसंख्य लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही पांडेय यांनी केला आहे.