मुंबई (वृत्तसंस्था) काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याकडून पैशांची बॅगही हस्तगत करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे पोलिसांनी मोहित कंबोज यांना सोडून दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केला आहे.
विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, भाजपचे बरेच नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मी पूर्वी मोहित कंबोज यांना ओळखत नव्हते. एका निवडणुकीच्या काळात मी दिंडोशी-मालाड परिसरात होते. तेव्हा पोलिसांनी नोटांच्या बॅगेसह मोहित कंबोज यांना पकडले होते. त्यावेळी मोहित कंबोज मतदारांना पैसे वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याविरोधात पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हा पोलीस मोहित कंबोज यांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. पण तेव्हा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करुन मोहित कंबोज यांना सोडायला सांगितले. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कंबोज त्यावेळी बचावले. त्यावेळी मोहित कंबोज कोण, हे मला कळाले, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले.
मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय. आता विद्या चव्हाण यांच्या या आरोपांना मोहित कंबोज कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.