अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दोन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या धुळ्याच्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात असलम खान पठाण (रा. गुलाब हाजी नगर, देवपूर धुळे) याच्याविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि.१८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत गेली होती. त्यानंतर १.१५ वाजता शाळा सुटल्यानंतर ती व तिच्या मैत्रिणी घरी पायी पायी जात होत्या. त्याचवेळी पवन चौकाजवळ रेशन दुकानासमोर चालत असतांना त्यांच्या मागून असलम खान पठाण (रा. गुलाब हाजी नगर, देवपूर धुळे) हा रिक्षा घेऊन आला. त्यानंतर त्याने विद्यार्थिनींच्या जवळ रिक्षा थांबवून एकीचा धरुन मला म्हणाला की, तू रिक्षामध्ये बस व माझ्या सोबत चल. परंतू विद्यार्थिनीने त्याच्या हातास झटका देत हात त्याच्या तावडीतून सोडला आणि विद्यार्थिंनी घाबरुन घराच्या दिशेने पळू लागल्या.
त्यानंतर विद्यार्थिंनी गांधलीपुरा भागातील गरीब नवाज चौकाजवळ पायी चालत असतांना रिक्षाचालक असलम हा पुन्हा पाठलाग करत तेथे पोहचला आणि पिडीत विद्यार्थिनीला तू माझा मोबाईल नंबर घे आपण फोनवर बोलू, असे म्हटला. एवढेच नाही तर एकीचा हात धरुन, तिस म्हणाला की, ही माझ्या सोबत येत नाही तर तु माझ्या सोबत रीक्षामध्ये बस आपण फिरायला जाऊ. दरम्यान, काही नागरिकांच्या लक्षात घटना आल्यानंतर संशयित आरोपी असलमला नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात असलम खान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरसिंह ताराचंद वाघ हे करीत आहेत.