नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात तीन लाखांहून अधिक कोरोना (Covid cases) रुग्ण आढळून येत आहेत. देशात गेल्या चोवीस तासात ३ लाख ६ हजार ०६४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख ६ हजार ०६४ रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत रविवारी २७ हजार ४७९ कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी ४३९ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ४३ हजार ४९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या २२ लाख ४९ हजार ३३५ सक्रिय रुग्ण उपचाराधीन असून पॉझिटीव्हीटी रेट २०.७५ टक्क्यांवर आहे. तर, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ६८ लाख ४ हजार १४५ वर पोहोचली आहे. विकली पॉझिटिव्हीटी रेट १७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १६२.२६ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील रुग्णांची स्थिती
रविवारी राज्यात ४० हजार ८०५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात २७ हजार ३७७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ७० लाख ६७ हजार ९५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर,राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २५७९ वर पोहोचली आहे. तर, १२२५ जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. रविवारी एकाही ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.
अर्थसंकल्पीय संसद अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्या सुरू
संसदेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८७५ लोकांचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. हा डेटा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून ते २० जानेवारीपर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांचा आहे. तिसरी लाट सुरू झाल्यापासून संसदेत तब्बल २८४७ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यापैकी ८७५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण चाचण्यांपैकी ९१५ राज्यसभा सचिवालयाने घेतल्या आणि त्यातील २७१ जण पॉझिटिव्ह आढळले, असे त्यांनी सांगितले.