लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर अखिलेश यादव यांनी ट्विट करून निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपची घसरण सातत्याने सुरू राहणार. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला, उर्वरित काही दिवसांत होईल. जनहिताचा लढा जिंकेल, असं अखिलेश यादव म्हणाले.
काल (१० मार्च) ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशसह 4 राज्यांमध्ये आपली सत्ता राखण्यात यश आले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने दोन रेकॉर्ड बनवले. उत्तराखंडमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याला भाजपने ब्रेक लावला आणि सगल दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तर तिकडे उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एका पक्षाने पूर्ण बहुमताने सत्तेत पुनरागमन केले. दरम्यान, या निकालानंतर समाजवादी पार्टीचे सुप्रीमो अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली. भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन करुन २७३ जागा जिंकल्या. तर, राज्यातील प्रमुख विरोधी समाजवादी पक्षाने १२५ जागा जिंकल्या. निवडणुकीतील पराभवानंतर सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘भाजपच्या जागा कमी होऊ शकतात हे आम्ही दाखवून दिले आहे’, असे ट्विट केले आहे.
अखिलेश यादव यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘आमच्या जागा अडीच पट आणि मतदानाची टक्केवारी दीड पट वाढवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार! भाजपच्या जागा कमी होऊ शकतात, हे आम्ही दाखवून दिले आहे. भाजपची ही घसरण सातत्याने सुरू राहणार. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला, उर्वरित काही दिवसांत होईल. जनहिताचा लढा जिंकेल!’