अहमदनगर (वृत्तसंस्था) भरधाव कारने घराच्या ओट्यावर बसलेल्या माय लेकाचा चिरडून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीत ही घटना घडली. वाहन चालक किरण राजाराम श्रीमंदीलकर (वय २५, रा. पारनेर) याने मागील भांडणातून जीवे मारल्याची फिर्याद चंद्रकला शिवाजी येणारे यांनी पोलिस ठाण्यात दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
गुरुवारी सांयकाळी शितल अजय येणारे (वय २७), रा. कुंभारगल्ली, पारनेर) व त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा स्वराज अजय येणारे हे घराच्या ओट्यावर बसले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दाभाडे वाडयाकडून लाल चौकाच्या दिशेने भरधाव आलेल्या फोक्सवेगन प्रोलो (क्र.एम.एच.१२ आर. टी. २७७७) या कारने प्रथम शीतल येणारे यांच्या घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीला जोरदार धडक दिली, त्यानंतर कारने दारात बसलेल्या शितल व स्वराज यांना चिरडले होते. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात वाटत होता; परंतु फिर्यादीनंतर पारनेर पोलिसांनी आरोपी किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
जागेच्या वादातून खून !
अपघाताची माहिती समजल्यानंतर परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत कार उचलून शतल यांना बाजूला काढले व दोघांनाही पारनेरच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आले असता, तेथे नगर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, नगर येथे पोहचण्यापूर्वीच शीतल यांचा वाटेतच मृत्यू झाला होता. स्वराज यास नगरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यास विळद घाटातील विखे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. स्वराज यास विखे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचार सुरू असतानाच मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आरोपी किरण श्रीदिलकर व मयताचे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात जागेचा वाद होता व याच वादातून किरण श्रीमंदिलकर याने मयत मायलेकांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या केल्याचे म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करीत आहेत. दरम्यान, संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.