जळगाव (प्रतिनिधी) अभ्यास करणाऱ्या मुलीने मोबाईलवर सुरू असलेले गाणे बंद केले. त्यामुळे रागाच्या भरात दारुच्या नशेत असलेल्या बापाने तिला कुकरच्या झाकणाने मारले. तर काचेचा ग्लास फोडून पत्नीलाही मारहाण केली. ही घटना दि. १५ रोजी शहरातील चंदू अण्णा नगरात घडली. या प्रकरणी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्याती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चंदू अण्णा नगरातील समाधान पाटील हा मद्यपान करून घरी आला. त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणे लावले होते. त्यावेळी त्याची मुलगी प्राप्ती पाटील हिने ‘पप्पा मोबाईल बंद करा, मी अभ्यास करीत आहे’ असे सांगितले. मात्र त्याने ऐकले नाही, त्यामुळे मुलीने मोबाईलवरील गाणे बंद केले. या रागातून त्याने काचेचा ग्लास फोडून पत्नी जागृती पाटील हिला मारहाण करू लागला. त्यामुळे मुलगी सोडविण्यासाठी गेली असता कुकरच्या झाकणाने तिच्या हातावर मारून जखम केली.
खून करण्याची दिली धमकी
पत्नी व मुलीला मारहाण केल्यानंतर समाधान पाटील हा कल्याणेहोळ या मूळ गावी गेला व या दोघींचा खून करणार असे त्याने त्याच्या आई-वडिलांकडे सांगितले. या प्रकरणी जागृती पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून समाधान पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.