जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कुविख्यात गुन्हेगार किरण शंकर खर्चे (30, खूबचंद साहित्या नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध आज ‘एमपीडीए’ची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला मिरा भाईंदर येथून ताब्यात घेत पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. खर्चेविरोधात हाणामारी, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण तसेच इतर स्वरूपाचे तब्बल 17 गंभीर गुन्हे तर अन्य ६ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
किरण खर्चे हा गुन्हा केल्यानंतर जामिनावर सुटताच पुन्हा गुन्हे करीत होता. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी किरणला स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. 14 मे रोजी गुन्हे शाखेकडे प्रस्ताव आल्यानंतर अवलोकन केल्यावर हा प्रस्ताव जळगाव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शनिवार, 3 रोजी संशयितास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. किरण हा जळगावात नसल्याने त्याचा एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने चार दिवस मुंबईत शोध घेतला. त्यानंतर मंगळवारी मिरा भाईंदर येथून त्यास ताब्यात घेत येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.
संशयिताला मुंबईत अटक करण्याकामी एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजू तांबे, अविनाश गरजे, संदीप शिंदे, सचिन सावंत, प्रशांत विसपुते यांच्या पथकाने परीश्रम घेतले तर एमपीडीएची कारवाई जळगाव अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनूस शेख इब्राहिम, सुनील पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, ईश्वर पंडीत पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.