नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात बाराहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेत खासदारांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी सरकारवर केला.
विजय चौक येथे आल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.”आम्ही पेगाससचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावं लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे,” असे राहुल गांधीनी यावेळी म्हटलं.
“संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे, ”असे राहुल गांधी म्हणाले.
संपूर्ण पावसाळी अधिवेशनात संसदेत केंद्रावर कारभारावर हल्ला चढवणारे राहुल गांधी म्हणाले, “काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला.