यवतमाळ (वृत्तसंस्था) : तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला, या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात धडकल्या. अमरावती शहरात आंतरधर्मीय विवाह प्रकरणात पोराशी थोडा कडक व्यवहार करा, असे मी अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी फोन केल्यानंतर त्यांनी आपला फोन रेकॉर्ड केल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला. पोलिस सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात आंतरधर्मीय विवाहानंतर तरुणीवर अत्याचार झाल्याचा आरोप भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला असून हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीला समोर आणण्याची मागणी त्यांनी केली.
पोलिस स्टेशनच्या बाहेर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, आपल्या मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. तेव्हा मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला. पोलिसांना माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. आम्ही दलित समाजाचे म्हणून आमचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत.
दोन तासांत मुलीचा शोध घ्या
राणा म्हणाल्या की, त्या मुलाची रात्रीपासून चौकशी सुरू आहेत. पण, काही समोर येत नाही. मुलगी कुठे आहे. याबाबत उत्तरे दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल. सगळे बोलायला लागतील. शिवाय, दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम त्यांनी पोलिसांना दिला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, संपूर्ण अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण वाढत आहेत. अमरावतीत दररोज अशा घटना घडत आहेत. 15 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलींना पळवून नेले जाते आणि नंतर त्या मुलींवर अत्याचार केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.