नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने काल रात्री भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये १५ सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती घोषणा आहे. MS धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर म्हणजे मार्गदर्शक असेल. शिवाय फिरकीपटू आर. अश्विनलाही तबब्ल चार वर्षानंतर भारताच्या टी-२० संघात संधी देण्यात आली आहे.
धोनीने आतापर्यंत आपल्या व्यूव्हरचनेने अनेक वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजलं. शक्य नसतानाही अनेक विजय शक्य करुन दाखवले. कधी आक्रमक धुव्वाधार खेळी करुन तर कधी स्टम्प्सच्या मागे राहून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अनाकलनीय बदल करुन आता टी ट्वेन्टी क्रिकेट संघात धोनी खुद्द मैदानावर नसेल पण मैदानाबाहेर राहून तो विराटसेनेला प्रतिस्पर्ध्याना चितपट करण्याचे धडे देणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी धोनीची टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या मेन्टॉरपदी निवड केलीय.
दरम्यान, धोनी आणि विराटची जोडी वर्ल्डकप गाजवणार आणि रोहित-विराट-धोनीचे REUNION’ पाहायला मिळणार, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. या संघात अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, इशान किशन सारख्या युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि कृणाल पंड्या यांना संघात स्थान मिळवता आलेले नाही. एवढेच नव्हे, तर लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलची देखील टी-२० वर्ल्डकप संघात निवड झालेली नाही.
भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने नव्या अटी आणि सूचना जारी केल्या आहेत. या स्पर्धेसाठी १५ खेळाडू आणि ८ अधिकाऱ्यांना आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.
















