नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने वैयक्तिक आणि एमएसएमई कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हटले की, मोरेटोरियम मुदतीच्या सहा महिन्यांच्या व्याजातील व्याज माफ करण्यास तयार आहे. परंतु, या व्याज माफीचा फायदा केवळ दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर मिळणार आहे. याशिवाय मार्च ते ऑगस्ट या कालावधीत ज्यांनी थकबाकी भरली आहे त्यांनाही व्याजावरील व्याज माफीचा लाभ मिळणार आहे.
अर्थ मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, सरकार छोटे कर्जदारांना पाठिंबा देण्याची परंपरा सुरूच ठेवेल. प्रतिज्ञापत्रानुसार व्याज माफ किंवा चक्रवाढ व्याज माफीमुळे बँकांवर पडणारा बोजा सरकार उचलेल. यासाठी संसदेची मंजुरी घेण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.
यांना मिळणार लाभ
एमएसएमई कर्ज
शैक्षणिक कर्ज
गृह कर्ज
ग्राहक टिकाऊ कर्ज
क्रेडिट कार्ड ड्यू
वाहन कर्ज
व्यावसायिकांचे वैयक्तिक कर्ज
सवलत कर्ज
सर्व कर्जमाफीसाठी 6 लाख कोटी रुपये लागतील
आरोग्य मंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हटले की, सर्व प्रकारच्या कर्जाच्या मोरेटोरियम अवधीचे कर्ज माफ केल्यास 6 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल. यामुळे बँकांच्या एकूण नेटवर्थमध्ये मोठी कपात होईल. मंत्रालयानुसार एखाद्या व्यक्तीचे कर्ज दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला व्याजावरील व्याज माफीचा लाभ मिळणार नाही.