जळगाव प्रतिनिधी : पत्रकारिता क्षेत्रात व्यावसायिकता, शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात केवळ पदवीधर पत्रकारांची स्वतंत्र संघटना ‘पदवीधर पत्रकार संघ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वृत्तपत्र विद्या (Journalism) क्षेत्रात पदवी प्राप्त केलेल्या पत्रकारांना एका व्यासपीठावर आणले जाणार असून, सभासद नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
सध्याच्या बदलत्या माध्यमांच्या काळात पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक पात्रतेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. अनेक तरुण पत्रकार विद्यापीठाची पदवी घेऊन या क्षेत्रात करिअर करत आहेत. या पदवीधर पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांना कायदेशीर संरक्षण मिळवून देणे आणि डिजिटल युगातील नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, ही या संघाची मुख्य उद्दिष्टे आहेत.
केवळ पदवीधरांनाच प्रवेश:
या संघटनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पत्रकारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या व जनसंवाद (B.J./M.J./B.M.M./M.C.J.) या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे, त्यांनाच या संघाचे प्राथमिक सभासद होता येईल. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदवीधर पत्रकारांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे:
पदवीधर पत्रकारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक समस्या सोडवणे,जिल्हा व तालुका स्तरावर अभ्यासपूर्ण पत्रकारितेला प्रोत्साहन देणे,शासनाच्या विविध योजनांचा लाभ पत्रकारांपर्यंत पोहोचवणे, पत्रकारितेतील नवोदित पदवीधरांना मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करणे.
जळगाव जिल्ह्यातील ज्या पत्रकारांकडे पत्रकारितेची पदवी आहे, त्यांनी आपले नाव, शैक्षणिक पात्रता, कार्यरत असलेल्या माध्यम संस्थेचे नाव इत्यादी माहिती ९३७२००७४६५ या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावा किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. लवकरच सर्व सदस्यांची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करून कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.
संपर्क:
ॲड जमील देशपांडे
४ मुळे कॉम्प्लेक्स
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या बाजूला गणपती नगर जळगाव.















