नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंड्रस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला आहे. जगभरातील सर्वात श्रीमंत १० लोकांच्या यादीत त्यांची ३ अंकांनी घसरण झाली आहे. फोर्ब्स बिलेनियर यादीत मुकेश अंबानी ६ व्या स्थानावरुन आता ९व्या स्थानावर पोहोचले आहेत.
काल रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानं मुकेश अंबानी यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियरच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांच्या कमाईत ५० हजार ६५८ कोटी रुपयांची घट झाली आहे. आता त्यांची संपत्ती ७१.५ अब्ज डॉलरवर येऊन पोहोचली आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर्सच्या यादीत गूगलचे सह-संस्थापक लैरी पेज यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर अँमेझॉनचे CEO आणि संस्थापक जेफ बेजोस आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ८.६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळावली आहे. २३ मार्चनंतर रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समधील ही सर्वाधिक घसरण आहे. गेल्या ७ महिन्यात रिलायन्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. त्यामुळे मुकेश अंबानी यांना ६.८ अब्ज डॉलर म्हणजे ५० हजार ६५८ कोटी रुपयांचं नुकसान रिलायन्स इंडस्ट्रीज ला झाले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा १५ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचं कामकाज आणि नफ्यावर कोरोना महामारीचा प्रभाव पडल्यानं ही घट झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.