लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊच्या न्यायालय परिसरात कुख्यात गुन्हेगार संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच अतिक अहमद या कुख्यात गुंडाची पोलिसांच्या ताब्यात असताना संपूर्ण मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. असं असताना आता थेट कोर्टात घुसून केलेल्या हत्येमुळे उत्तर प्रदेश पुन्हा एकदा हादरून गेला आहे. मारेकरी हा वकिलाच्या पेहरावात आला होता आणि त्याने कोर्टात घुसून बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात संजीव जीवा हा जागीच ठार. पण यावेळी एक मुलगी आणि एका महिलेलाही गोळी लागली असल्याचं समजतं आहे. या घटनेनंतर एका मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना घडवणाऱ्या हल्लेखोराचे नाव विजय यादव असे असून तो जौनपूरमधील केरकटचा रहिवासी आहे.
संजीव जीवा हा मुख्तार अन्सारी आणि मुन्ना बजरंगी गँगशी संबंधित होता. भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येतही संजीव जीवाचे नाव आले आहे. मात्र, नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. संजीव हा पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वात कुख्यात गुन्हेगार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपासून तो लखनौ कारागृहात होता. त्याला येथूनच एका खटल्यासाठी न्यायालयात नेण्यात आले होते. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर, आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही संजीव माहेश्वरीने व्यक्त केली होती. दरम्यान, संजीव जीवा हा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचा रहिवासी होता. मुख्तार अन्सारीसोबत त्याचे कनेक्शन होतं. तो मुख्तारचा शूटर होता.