मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील एका सॉफ्टवेअर इंजिनियरची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेतून बोलत असल्याचे भासवून २५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सॉफ्टवेअर इंजिनियर किरण अशोक इंगळे (वय २८ रा. गोदावरी नगर, ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ मे २०२२ रोजी किरण इंगळे हे त्यांचे घरी असतांना त्यांच्या मोबाईलवर ८३७१८३०९७४ या मोबाईल क्रमांकावरून वरुन एक अनोळखी महिलाने फोन करुन मी ICICI बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या क्रेडीट कार्डवर हेल्थ इंशुरन्सची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही सदर सुविधा चालू ठेवण्यासाठी तुम्हाला ८ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे किरण इंगळे यांनी त्यांना नाही सांगितले. तेव्हा त्यांनी इंगळे यांना तुमच्याकडे दोन क्रेडीट कार्ड आहे. त्यापैकी एक बंद आहे, असे सांगून त्यांनी इंगळे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सदर महिलेला सांगीतला. यानंतर इंगळे यांच्या क्रेडीट कार्डवरुन २५ हजार रुपये कपात झाले. तेव्हा इंगळे यांच्या लक्षात आले की, सदर महिला ही कोणत्याही बँकेतून बोलत नसून माझी आर्थिक फसवणुक केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ असीम तडवी हे करीत आहेत.