जळगाव (प्रतिनिधी) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध खासगी फौजदारी खटला दाखल होता. पोलीस यासाठी तिला त्वरित अटकही करु शकतात. मुंबई पोलीस अँक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करु शकतात, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाच्या तपासात कंगना रनौत पोलिसांना सहकार्य करत नसेल तर ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरेल, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. उज्ज्वल निकम जळगावात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निकम यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याशी निगडित न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत मत मांडले. निकम म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना रनौतला दोन वेळा समन्स बजावले, तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल (अजामिनपात्र) किंवा बेलेबल (जामिनपात्र) वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. कंगनासह तिची बहीण रंगोली रनौत-चंदेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. येत्या २३ नोव्हेंबरला कंगनाला, तर २४ नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.