मुंबई (वृत्तसंस्था) गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केलं. राजस्थानी मारवाडी समाजानं व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालयं, इस्पितळं बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तिथं तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो, असं राज्यपालांनी म्हटलं. परंतू यानंतर गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं. यानंतर आता राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील या वक्तव्यावरून टीका केलीय की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.