यावल (प्रतिनिधी) विरावली- दहिगाव रस्त्यावरील खिरवड नाल्याजवळ दहिगाव येथील इमरान युनूस पटेल या युवकाची दि. २९ शुक्रवारी रोजी रात्री हत्या करण्यात आली. याप्रकरणातील दोन संशयित तरूण स्वतः यावल पोलीस ठाण्यात हजर होत हत्येची कबुली दिली. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती.
पो. नि. रंगनाथ धारबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. शव विच्छेदनासाठी मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संशयित आरोपींना आज येथील न्यायालयात हजर केले असता चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मृत युवकाचे वडील युनुस इसा पटेल यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून व संशयित आरोपी ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९), गजानन रविद्र कोळी (वय १९) हे हत्येनंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर घटनेची कबुली दिल्यावरून दोघे संशयिताविरूध्द हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इमरान युनूस पटेल (वय १९) हा युवक हनुमंतखेडे, ता. धरणगाव येथील मुळ रहिवाशी असून तालुक्यातील दहीगाव येथील सुरेशआबा नगरातील इसा हिराजी पटेल हे त्याचे आजोबा असून ते वृध्द असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून दहिगाव येथेच राहत असल्याचे त्याचे वडील युनुस युनुस इसा पटेल यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित नमूद केले आहे. शनिवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी घटनेचा आढावा घेत. पो. नि. रंगनाथ धारबळे यांना तपासणी संदर्भात मार्गदर्शन केले. मृतदेहाचे शनिवारी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
दहीगाव येथे अंत्यविधी पार पडला. घटनेचे वृत्त कळताच येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळपासूनच नातेवाईकांनी गर्दी केली होती. पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले की, दोन्ही संशयितांनी युवकाची हत्या केली आहे. हत्या का केली याबाबत तपास सुरू आहे. मात्र, आतापर्यंत समजलेले कारण असे की, संशयित आरोपीपैकी एकाकडून मृत इमरान याने २००० रुपये घेतले होते. वारंवार मागूनही मृताने दिले नाही. याशिवाय अन्य कोणते कारण आहे. याबाबत पोलीस बारकाईने तपास करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.