जळगाव (प्रतिनिधी) १६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा कापून खून प्रकरणात फरार असलेल्या दोन कुविख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (वय ३८ रा. उमरपाडा, सुरत) आणि प्रज्ञनेश दिलीप गामीत )वय २६ रा. तरकुवा डुंगरी फलीया ता. व्यारा जि. तापी गुजरात), असे अटक केलेल्या संशयित गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांना शहरातील अजिंठा चौकातून अटक करण्यात आलीय.
सुरतचे एमआयएमचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी अफजल अब्दुल शेख व प्रज्ञनेश दिलीप गामीत यांनी दिली होती. या दोघांनी ८ जून रोजी सुरत येथील बिलाल चांदी व अज्जू या दोघांचा गळा कापून खून केला होता. तेव्हापासून हे दोघेजण फरार झाले होते. गुजरात पोलीसाचे ११ पथक त्यांच्या मागावर होते. हे दोन्ही कुविख्यात गुन्हेगार हे जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे पोहेकॉ अक्रम शेख यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी गुरुवारी २७ जून रोजी रात्री १० वाजता सापळा रचून दोघांना शिताफिने ताब्यात घेतले.
दोघां संशयितांची विचारपूस केली असता १६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा चिरून हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलीसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता अफजल अब्दुल शेख हा सुपारी घेऊन ५ जणांचे खून केल्याचे गुन्हे दाखल आहे. तर प्रज्ञेश गामीत याच्यावर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. हे आरोपी सुरत येथील कुविख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधासाठी गुजरात पोलिसांनी 11 पथके तयार केली होती. या दोघांना अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे