मुंबई (प्रतिनिधी) : माझ्या विरोधात षडयंत्र सुरू आहे. संपूर्ण जगाला माहित आहे की, माझा शत्रू, माझा मित्र एकच आहे. दुर्दैव म्हणजे तोच माझा पती देखील आहे. माझी कोणाशीच दुश्मनी नाही. माझ्यासोबत होत असलेल्या सगळ्या घटना या माझ्या पतींकडूनच होत आहेत. हा आरोप नव्हे तर मी स्वतः थेट सांगत आहे, अशाप्रकारची प्रतिक्रिया करुणा मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
करुणा मुंडेंनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्या. त्या म्हणाल्या, मला जनतेच्या सेवेत तत्पर राहायचे आहे. मात्र, माझ्यावर वेगवेगळ्या खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. मला काम करण्यापासून रोखण्यात येत असल्याचा आरोप मुंडेंनी यावेळी केला.
मेळाव्यात चारचांद लावावे
करुणा म्हणाल्या, मेळावा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मला जास्तच त्रास दिला जात आहे. भगवान गडावर मेळावा घेण्याचा मलाही अधिकार आहे. मी सामाजिक मेळावा घेऊ इच्छिते. हा राजकीय मेळावा नसेल. यासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रित करणार आहे. माझ्या मेळाव्यात येऊन त्यांनी चारचांद लावावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्यावर त्यांची कृपादृष्टी पडावी.
मला पोलिस संरक्षण द्या
करुणा म्हणाल्या, 8 दिवसांपूर्वी गणपतीमध्ये माझ्यावर हल्ला झाला. मात्र, ही गोष्ट अजून बाहेर उघड केलेली नाही. माझ्या जीवावर बेतले होते. याचबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मी महाराष्ट्रात काम कसे करू याबाबत माझ्या समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले आहे. मला पोलिस संरक्षण देण्यात यावे यासाठीही निवेदन दिले आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे काम करण्याचे आश्वासन दिल्याचे मुंडे यांनी म्हटले.
धमक्यांना घाबरणारी नाही
करुणा म्हणाल्या, सगळ्या गोष्टी मी आता सांगू शकत नाही. मात्र, लवकरच पत्रकार परिषद घेत याबाबत गोष्टी उघड करणार आहे. मला कशाप्रकारच्या धमक्या मिळत आहेत. ज्यामध्ये व्हिडीओ बनवण्याची धमकी, फोटो मॉर्फिंगची धमकी. मात्र, मी अशा धमक्यांना घाबरणारी नाही. हे सर्व कोण करत आहे? यावर करुणा मुंडेंनी थेट माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचे नाव घेतले.