माय मराठी स्पंदन आमचे
वाणी वागेश्वरी असे
विवेकसिंधू अग्रणी
मुकुंदराजांना नमन असे
न च केवळ भाषा,बोली
जगण्याची रीत,भावातीत असे
महाराष्ट्राच्या मातीमधले
नितांत सुंदर गीत असे
स्फुरण चढावे तुज उच्चारता
धगधगती तू आग असे
मृदू,मुलायम,कोमल
हृदयामधले भाव असे
अर्थ पेरता शब्दांचा या
क्षणात युगाचा शीण जातसे
काशी, प्रयाग, वैकुंठच हे
तव बोलीने अवतरत असे
शब्द मराठी जादू करती
प्रज्वलित मन होत असे
शिवबांच्या शब्द सादीला
मावळ प्रांत खडा दिसे
टिळकांच्या करड्या बोलीने
स्वातंत्र्याचे स्वप्न दिसें
जयोस्तुते या काव्यातुनी
मृत्युन्जय वीर अमर असे
पसायदान हे ज्ञानेशाचे
विश्वशांतीला भजत असे
अभंगवाणीचे सुधामृत हे
लतादीदीच्या स्वरातून झरतसे
अमृतकुंभ मराठीचा
अमरतत्वाने विलसतसे
इंद्रायणीत जगद्गुरूगाथा
परी जनात मुखोदगत असे
कल्याणकारी हृदय हर्षिणीम
कल्पतरूचे झाड असे
उगवुन महाराष्ट्राच्या मातीमधुनी
छाया जगभर पसरतसे
विशाखा, कोसला,मृत्युंजय
ग्रामगीता,फकिरा अजरामर असे
शब्दप्रभू आमुचें तात्या
तारा बनूनी लुकलूक दिसें
प्रीती इंगळे चौधरी .प्रा.शिक्षिका (नांदेड) जळगाव.
















