नागपूर (वृत्तसंस्था) अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि., धामना येथील फटाक्याच्या दारुगोळा बनवणाऱ्या कारखान्यातील फटाकावातीचे काम करणाऱ्या युनिटमध्ये स्फोट झाल्याने पाच जणांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी आहेत. फटाकावातीचे रिल्स बनवताना मशीनमध्ये अतिउष्णता झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता घडली.
विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच याच मार्गावरील सोलर कंपनीतील स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या गावात या स्फोटाचे हादरे बसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मृतांमध्ये प्रांजली किसना मोदरे (२२), प्राची श्रीकांत फलके (१९), वैशाली आनंदा क्षीरसागर (२०), मोनाली शंकर अलोणे (२५), शीतल आशिष चटप (३०, सर्व रा. धामना, ता. नागपूर) व पन्नालाल बंदेद्वार (६० रा सातनवरी ता नागपूर) यांचा समावेश आहे. शीतल चटप हिचा उपचारादरम्यान नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींमध्ये श्रद्धा वनराज पाटील (२२, रा. धामना, ता. नागपूर), प्रमोद चव्हारे (२५, नेरी मानकर, ता. हिंगणा) व दानसा म्हरसकोल्हे (धमनिया फलसंज पो. कोहका, ता. पराशिया मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचाराथ नागपुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
माहितीनुसार न्यू मायक्रो प्लांट (वात बनवण्याचे काम करण्याचे युनिट) मध्ये दारुगोळ्याचे ३१ रिल्स होते. मशीनवर हे रिल्स पॅकिंग होत असताना अतिउष्ण तापमानामुळे दारुगोळ्याचा स्फोट झाला. या युनिटमध्ये १८ कामगार काम करीत होते. मात्र जेवणाची वेळ झाल्याने अर्धे कामगार जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे ओमकार गजभिये (३३), मूलचंद भुसारी (३५), प्रशांत लांजेवार (३५) व इतर हे कामगार सुदैवाने बचावले. या स्फोटात मशीनचे अक्षरशः तुकडे झाले व ते दूरवर उडाल्याची माहिती आहे. कंपनी प्रशासनाच्या कामगारांना सुरक्षेची दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. कुठलीही साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.